Breaking

मंगळवार, मे २४, २०२२

आगामी चार दिवसात राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता !

 



मुंबई : आगामी चार दिवस राज्याच्या काही भागात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला असून काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देखील देण्यात आला आहे. 


यावर्षी ऐन उन्हाळ्यात काही जिल्ह्यात पावसाळयासारखा पाऊस बरसला असून ओढे नाले तुडुंब भरून गेले आहेत आणि उभ्या पिकांना आडवे करून शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान देखील केलेले आहे. सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि विदर्भागाच्या काही भागात अवकाळी पावसाने जोरदार धिंगाणा घातला आहे आणि आता पुन्हा काही जिल्ह्यात पुढील चार दिवसांत पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राजस्थान उत्तर पूर्व ते उत्तर पूर्व अरबी समुद्र या दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याचा परिणाम हवामानावर झाला असून पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. (Forecast of pre-monsoon rains for next four days)  हवामान विभागाच्या अंदाजानुसा पुढील चार दिवसात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह कोकण आणि विदर्भाच्या काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे.   


उत्तर भारतातील बऱ्याचशा राज्यात पावसाचा धिंगाणा सुरु असून राज्यात देखील कोकण, कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्रातील काही भागात आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह, ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होत आगामी चार दिवस पाऊस कोसळणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. यावर्षी मान्सून वेळेच्या आधीच दाखल होईल असे सांगितले जात होते परंतु ही शक्यता आता कमी होताना दिसत आहे. बंगाल उपसागर आणि अंदमान येथे दाखल झालेला मोसमी पाऊस पुढे सरकण्यास अडथळे येत आहेत. त्याच्या प्रवासासाठी अनुकूल वातावरण निर्माण न झाल्याने पावसाचा प्रवास तेथेच थांबला आहे. 


या जिल्ह्यात पाऊस 

सांगली, कोल्हापूर, ठाणे, पालघर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, नंदुरबार, धुळे, अहमदनगर, यवतमाळ, जळगाव या जिल्ह्यात पुढील चार दिवसात पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हा पाऊस मुसळधार होऊ शकतो असा हवामान शास्त्र विभागाचा अंदाज आहे.  


राज्यात लवकर आगमन 

दरवर्षी मोसमी पाऊस १० जून रोजी मुंबईत दाखल होत असतो परंतु यावर्षी त्याचे आगमन लवकर होईल असा हवामान विभागाला विश्वास आहे. राज्यात ३ ते ९ जून दरम्यान मान्सून दाखल होईल आणि १० ते १६ जून दरम्यान मुसळधार पाऊस कोसळू शकतो असा हवामान विभागाचा अंदाज आहे. 


शेतकऱ्यांसाठी महत्वाचे 

राज्याच्या काही भागात चांगला पाउस पडत असल्यामुळे शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला आहे पण यामुळे त्यांची मोठी फसगत होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. हा पाऊस मान्सूनपूर्व पाऊस आहे त्यामुळे तो हुलकावणी देवू शकतो. आता पेरणी केली आणि पुढे पाऊस लांबला तर पेरणी केलेल्या पिकांचे नुकसान होऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी या पावसावर अवलंबून राहू नये असे कृषी मात्री दादा भुसे यांनी आवाहन केलेले आहे.


हे जरूर वाचा : >>>>




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा