Breaking

बुधवार, जून ०८, २०२२

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा उद्रेक, चौथ्या लाटेची दहशत !

 


मुंबई : महाराष्ट्र राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होऊ लागला असून संसर्गदरात वेगाने वाढ होऊ लागली आहे त्यामुळे कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती व्यक्त होत आहे.


कोरोनाची तिसरी लाट ओसरण्याच्या मार्गावर होती तेंव्हापासूनच चौथ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात होती . अर्थात यात अभ्यासंकातच मतमतांतरे होती परंतु जून महिन्यात ही लाट प्रभावी झालेली असेल असे सांगितले जात होते. जून महिना उजाडण्यापूर्वीच म्हणजे मे महिन्यांपासून राज्याच्या विविध भागात पुन्हा एकदा कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येऊ लागले. सुरुवातीला तुरळक असणारी रुग्णसंख्या दिवसागणिक वाढताना दिसू लागली आणि आता तर याचा वेग देखील वाढलेला आहे. राज्याच्या विविध भागात कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येत असले तरी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर अशा शहरात उद्रेकाची परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे.


राज्यातील एकूण परिस्थितीचा विचार करता कोरोनाला आता हलक्यात घेणे भलतेच महागात पडणार असल्याचे दिसत आहे.  कोरोना रुग्णांची वाढ हळूहळू सुरु झाली परंतु तिने नंतर भलताच वेग घेतला आहे. मे महिन्याच्या अंतिम आठवड्याची तुलना केली तर राज्यातील पालघर जिल्ह्यात ३५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही वाढ आणि वेग चिंता निर्माण करणारा आहे त्यामुळे सक्ती नसली तरी जनतेने कोरोना अटकावासाठी आवश्यक प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. (Corona erupts again in Maharashtra) धक्कादायक वाढ ही केवळ पालघर जिल्ह्यापुरती मर्यादित नसून ठाणे जिल्ह्यात १९२ टक्के तर मुंबईमध्ये ही वाढ १३६ टक्क्यांनी झालेली आहे.

 

प्रोटोकॉल पाळा - मुख्यमंत्री

मागील चोवीस तासात महाराष्ट्रात १ हजार ८८१ नव्या रुग्णांची भर पडली असून ही वेगवान वाढ पाहता कोरोनाची चौथी लाट असण्याची भीती देखील व्यक्त होऊ लागली आहे, दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला प्रोटोकॉल पाळण्याचे आवाहन केले आहे . लसीकरण करून घ्यावे तसेच मास्कचा वापर करावा असे आवाहन त्यांनी राज्यातील जनतेला केले आहे.


मुंबईत सर्वाधिक रुग्ण 

राज्यभर कोरोना रुग्णांची वाढ दिसत असली तरी राज्यात सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरात आहेत. मुंबईत एकूण ५ हजार ९७४ सक्रीय रुग्ण असून मागील चोवीस तासात १ हजार २४२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. एका दिवसातील रुग्णांचा आकडा आता हजाराच्याहे पुढे गेला आहे त्यामुळे अधिक चिंता व्यक्त होऊ लागली आहे. मुंबई हे सतत आणि मोठ्या गर्दीचे शहर आहे त्यामुळे संसर्गाचा अधिक धोका असतो.  


तरुण रुग्णच अधिक !

पहिल्या लाटेत साठ वर्षे वयाच्या पुढील नागरिकांना अधिक धोका झाला तर दुसऱ्या लाटेत जेष्ठ नागरिकांसह तरुण देखील बाधित होत होते परंतु सद्या तरुण वयोगटात कोरोनाचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. सद्या रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांत तीस वर्षे वयाच्या पुढील रुग्णांचा अधिक समावेश आहे. ३५ ते ४५ वयोगटातील तरुणांचा कोरोनाच्या नव्या रुग्णांत अधिक समावेश दिसून आला आहे. प्रवास करणाऱ्या आणि गर्दीच्या ठिकाणी वावर असलेल्या वयोगटात कोरोनाचा अधिक संसर्ग दिसून येत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा