Breaking

शनिवार, जून ११, २०२२

कोरोना सुसाट .... रुग्णसंख्येत झपाट्याने होतेय वाढ !

 


मुंबई : संपूर्ण देशासह राज्यात कोरोना सुसाट सुटला असून रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होऊ लागली आहे त्यामुळे वेळीच दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे. 


जून महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाचे आक्रमण वाढायला गतीने सुरुवात झाली आहे. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून देश आणि राज्यभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे समोर आले असले तरी जून महिन्यातील वाढ एकदम झपाट्याने सुरु झाली आहे. दरदिवशी आढळणारे रुग्ण हे वाढत्या पटींत आहेत त्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण होत आहे. कोरोनाच्या तिन्ही लाटांत अशीच सुरुवात होती आणि नंतर प्रचंड स्फोट झाला होता. रुग्ण वाढत असतानाच कोरोनाला अटकाव करण्याचे उपाय केले नाहीत आणि वेळीच काळजी घेतली नाही तर काय उद्रेक होतो हे या आधीच्या लाटांत अनुभवायला मिळालेले आहे. 


काल प्रसिद्ध झालेल्या अहवालाने अधिकची चिंता निर्माण केली आहे. मोठी रुग्णवाढ झाल्याचे या अहवालातून समोर आले आहे. २४ तासात राज्यात ३ हजार ८१ नव्या रुग्णांची भर पडली आहे. काही दिवसांपूर्वी वाढीचा आकडा हा शेकड्यात होता, तो आता हजाराच्या पटीत आला आहे. पाहता पाहता सक्रीय रुग्णांची संख्या १३ हजार ३२९ वर पोहोचली आहे. (Rapid growth of corona patients in Maharashtra) 


मुंबईत सर्वाधिक रुग्ण 

राज्याच्या सर्वच भागात कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येत आहेत परंतु मुंबईत मात्र उद्रेक होताना दिसू लागला आहे. काल राज्यात आढळलेल्या ३ हजार ८१ रुग्णात मुंबईमधील १ हजार ९५६ रुग्णांचा समावेश आहे. राज्याच्या तुलनेत मुंबईत पन्नास टक्क्याहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत.  मुंबई विभागात २ हजार ७३१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 


विभागवार रुग्ण 

सोलापूर, सातारा जिल्ह्यांचा समावेश असलेल्या पुणे विभागात २२३ नवे रुग्ण आढळले आहेत तर कोल्हापूर विभागात २४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. लातूर विभागात नव्या १३ रुग्णांची नोंद झाली आहे तर औरंगाबाद विभागात नवे ३ रुग्ण आढळले आहेत. अकोला विभागात ६ तर नागपूर विभागात नव्या ५३ रुग्णांची नोंद झाली आहे. 


कर्नाटकातही उद्रेक 

सोलापूर शेजारी असलेल्या कर्नाटक राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून तेथे सार्वजनिक ठिकाणे, हॉटेल, दुकाने आणि कारमध्येही मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. कालच कर्नाटक सरकराने हा आदेश जारी केला आहे. बंगळूर शहरात हा उद्रेक अधिक असून राज्यात काल आढळलेल्या नव्या ५२५ रुग्णांपैकी ४९४ रुग्ण एकट्या बंगळूर शहरातील आहेत. राज्यातील ३ हजार १७७ सक्रीय रुग्णातील ३ हजार ६१ रुग्ण केवळ बंगळूरमधील आहेत.  


अधिक बातम्यासाठी येथे क्लिक करा !



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा