Breaking

शुक्रवार, जून १०, २०२२

सून, सासरे आणि दीर एकाचवेळी बारावी पास !

 



नाशिक : बारावी परीक्षेच्या निकालात वेगवेगळे कौतुकाचे क्षण पाहायला मिळत असून सून, सासरे आणि दीर हे एकाच कुटुंबातील तिघे जण एकाचवेळी बारावी परीक्षेत पास झाल्याची वेगळी घटना समोर आली आहे.


शिक्षणाला वय नसतं हे पुन्हा पुन्हा समोर येत आहे. करमाळा तालुक्यातील कविटगाव येथील साक्षी सरडे आणि तिचे वडील शिवाजी सरडे यांनी एकाच वेळी बारावीची परीक्षा दिली आणि दोघेही घवघवीत मार्क मिळवून उत्तीर्ण देखील झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यात या घटनेची चर्चा सुरु असतानाच नाशिक येथून एक बातमी समोर आली आहे. (Exam success of three members of the same family) येथे सून, सासरे आणि दीर हे एकाच कुटुंबातील तिघे एकाचवेळी परीक्षा देवून बारावी उत्तीर्ण झाले असून या आगळ्या वेगळ्या घटनेची जोरदार चर्चा आणि कौतुकाचा वर्षाव देखील सुरु झाला आहे. 


त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आवटे येथे राहणारे देहाडे कुटुंब बारावी परीक्षेच्या निकालापासून चर्चेत आले आहे. पाच जणांच्या या कुटुंबात तिघे जण एकवेळी बारावी पास झाले आहेत. या कुटुंबाचे प्रमुख लक्ष्मण देहाडे हे दहावी पास झालेले होते. त्यांचा एक मुलगा महाविद्यालयात शास्त्र विभागात शिक्षण घेत आहे तर दुसरा मुलगा बारावीला आहे. लक्ष्मण देहाडे यांच्या थोरल्या मुलाचे लग्न अलीकडेच झाले असून त्यांची सून देखील दहावी पास झालेली होती. आपल्या सुनेने उच्च शिक्षण घ्यावे ही इच्छा या कुटुंबाची होती आणि लक्ष्मण देहाडे यांना देखील आपलेही अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करावे अशी इच्छा होती.   


अखेर या तिघांनीही बारावीची परीक्षा एकाच वेळी दिली आणि निकाल लागला तेंव्हा या एकाच कुटुंबातील तिघे देखील पास झाले आहेत. सून ऋतिका हिला ५० टक्के, सासरे लक्ष्मण देहाडे यांना ६४.५० टक्के तर दीर समीर याला ६४ टक्के गुण मिळाले आहेत. शिक्षणाची जिद्द आणि परिश्रमाची तयारी असली की यश कसे खेचून आणता येते हेच या कुटुंबातील तिघांनीही दाखवून दिले आहे. उत्तीर्ण झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे कौतुक होत असताना या वातावरणात देहाडे कुटुंबाचे मात्र वेगळे कौतुक सुरु आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा